बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)

 

 

(www.bnhs.org)

प्रकृती विज्ञानावरील निरिक्षणांची देवाणघेवाण करण्याकरिता आणि जीव नमुन्यांच्या सादरिकरणाकरिता बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना सन १८८३ साली केली गेली. निसर्ग आणि नैसर्गिक स्रोतसंवर्धन, प्रकृती विज्ञान ह्या विषयी संशोधन व शिक्षण आणि तब्बल ३० देशांमध्ये पसरलेले सदस्य असा व्यापक पसारा असणारी बीएनएचएस ही आजघडीची भारतीय उपखंडातील एक सर्वात मोठी गैरसरकारी संस्था आहे.

संवर्धन हे शास्त्रीय अभ्यासावरच आधारित हवे हे स्व. डॉ. सलिम अलींनी घालून दिलेले मार्गदर्शक तत्व बीएनएचएस तंतोतंत राबवते.

बी.एन.एच.एस. मधील

पक्ष्यांसंबंधित महत्वाचे प्रकल्प

संग्रह विभाग
सध्या उपलब्ध असलेली वन्यजीवासंबंधीची ब्रिटिश कालापसून संकलित केलेली बरीचशी माहिती हे बीएनएचएसचे एक मौलिक योगदान आहे. ज्याला भारताचा बहुमुल्य राष्ट्रीय ठेवा समजले जाते असे २६,००० पक्षी, ७५०० सरिसृप आणि उभयचर प्राणी, तसेच ५०,००० किटकांचे नमुने संस्थेने जतन करून ठेवले आहेत. कितीतरी दुर्मिळ प्रजातींचे नमुने हे ह्या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट.

ग्रंथालय विभाग
वन्यजीव आणि पर्यावरण तसेच शतकापुर्वीच्या शिकारकथा अशा नानाविध विषयांवरची पुस्तके, शास्त्रीय वार्तापत्रे ह्याचा समावेश असणारे भव्य दालन म्हणजे हॉर्नबिल सदनात वसवलेले सुसज्ज ग्रंथालय. आज जगात इतरत्र कुठेही उपलब्ध नसलेली, दुर्मिळ, अतिशय संदर, अवर्णनीय अशी पाषाणछाप चित्रे ही ग्रंथालयाची शान आहेत.

निसर्ग संवर्धन शिक्षण विभाग
हा विभाग दर वर्षी जवळजवळ १०,००० विद्यार्थ्यांपर्यंत निसर्ग संवर्धनाचा संदेश पोचवतो. अलिकडेच जागतिक विकास प्रशासन, यू.के. यांच्या मदतीने लोकसहभागातून पर्यावरणीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नविन पद्धतीने पर्यावरण शिक्षण उपक्रम राबवण्याचे प्रयत्न विभागातर्फ़े केले जात आहे.

संवर्धन विभाग
ह्या विभागातर्फ़े सलिम अली निसर्ग संवर्धन निधी उपक्रमांतर्गत, समाजातील विविध स्तरांमध्ये निसर्गाबद्दल जनजागृती घडवली जाते. तसेच सैन्य, प्रशासकीय, वन, प्रसारमाध्यमे आणि इतर सेवा क्षेत्रातील लोकांसाठी विविध पर्यावरण शिक्षण     
विद्यापीठ विभाग
प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी बीएनएचएस ही संस्था सन १९५७ पासून मुंबई विद्यापिठाशी संलग्न आहे.

संशोधन विभाग
बीएनएचएस ही संस्था विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय उपखंडातील वन्यजीवांच्या अभ्यासाची उद्गाती ठरली आहे. भारतातील पक्ष्यांचा अभ्यास सर्वप्रथम स्व. डॉ. सलिम अलींच्या अधिपत्त्याखालीच करण्यात आले. श्री हुमायुन अब्दुलालींनी अंदमान आणि निकोबार बेटे अभ्यासली. ह्या सर्व अभ्यासांच्या निषकर्षांची नोंद संस्थेकडे उपलब्ध आहे.

संस्थेने दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजाती आणि त्यांचे अधिवास ह्यांच्या संशोधनावर मोहिम उघडली आणि कित्येक प्रकल्प पूर्णत्वास नेले. खास नमूद करण्यासारखे प्रकल्प म्हणजे आशियायी हत्ती, माळढोक, बंगालचा तणमोर, जर्डनचा धाविक, पक्षी स्थलांतर अभ्यास, पक्ष्यांचा विमानांना धोका, गिधाडांचे कृत्रिम प्रजनन, बर्ड फ़्लू सर्वेक्षण तसेच पॉईंट कॅलिमियर वन्यजीव अभयारण्य आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान इथला परिस्थितीकीय अभ्यास. 

 

© 2008 copyright @ bnhsenvis.nic.in